पारोळा पोलिसांची मोठी कारवाई; शेतकऱ्याची चोरीस गेलेली जलपरी मोटार हस्तगत, तीन आरोपी गजाआड
अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा; ₹1 लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक
पारोळा | प्रतिनिधी : सुरेश पाटोळे
मंगरूळ येथील शेतकऱ्याच्या विहिरीतील चोरीस गेलेल्या जलपरी मोटार प्रकरणाचा पारोळा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली जलपरी मोटार तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा सुमारे ₹1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात सीआर क्रमांक 296/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा संवेदनशील विषय असल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या सूचनेवरून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक डॉ. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिथुन पाटील व आकाश पाटील यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने आरोपींचा शोध घेत तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली जलपरी मोटार आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, पारोळा पोलिसांच्या जलद आणि प्रभावी तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
