Spread the love

सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव येथे विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक उत्साहात संपन्न

नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांची प्रत्यक्ष उपस्थिती; विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले

विजय पाटील बोरगाव प्रतिनिधी

धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील सर्वज्ञ माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींच्या निवडणुकीची प्रक्रिया लोकशाही पद्धतीने आणि उत्साहात पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेस धरणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वतः मतदान करून विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली तसेच विद्यार्थी मतदान अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.

यावेळी नायब तहसीलदार सातपुते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत लोकशाही व्यवस्थेत मतदानाचे महत्त्व, मतदानाचा अधिकार आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला दोन्ही बोरगावचे पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक संदेश महानुभाव, निवडणूक प्रमुख पी. टी. पाटील, जेष्ठ शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व सुरळीत पार पडली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version