Spread the love

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा दिलासा

 

कार्ड न मिळालेल्या लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय; सवलतींचा लाभ पूर्ववत सुरू राहणार

हर्षल पाटील  मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डच्या अंमलबजावणीस १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.

राज्य शासनामार्फत अमृत ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास, तर सामान्य ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होते.

मात्र, अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप स्मार्ट कार्ड प्रत्यक्ष प्राप्त झालेले नाही. केवळ तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे कोणताही लाभार्थी सवलतीपासून वंचित राहू नये आणि प्रवाशांची गैरसोय टळावी, या उद्देशाने शासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. कार्ड वेळेत न मिळाल्यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये, म्हणूनच NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.”

या निर्णयामुळे राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ज्यांनी अद्याप NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत आवश्यक नोंदणी व कार्ड प्राप्त करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version