Spread the love

पालकमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आक्रमक; शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान

गांधीगिरीच्या माध्यमातून निषेध; धरणगावात घोषणाबाजी करत सरकारवर टीका

धरणगाव | प्रतिनिधी : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ धरणगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने गांधीगिरीच्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

चाळीसगाव येथे महावितरणच्या एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात प्रतिक्रिया उमटत असताना धरणगावातही विरोधकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात आयोजित आंदोलनात शेतकऱ्यांना गुलाबपुष्प देत सरकारच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी लावण्यात आलेल्या “उद्योजकांना देऊ नका त्रास, शेतकऱ्यांना मिळणार गुलाब हमखास” या फलकाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. व्ही. डी. पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका करत, अशा विधानांमुळे महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अधिक दुर्लक्ष करतील, अशी भीती व्यक्त केली. तसेच त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरही निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी, निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची आठवण काढणारे नेते इतर वेळी त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप केला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी, शेतकऱ्यांना त्रास होत असल्याची कबुली देण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. काँग्रेसचे सुनील सोनार यांनी गांधीजींच्या विचारांनुसार शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदविल्याचे स्पष्ट केले.

या आंदोलनात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. घोषणाबाजीमुळे परिसर काही काळ दणाणून गेला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version