मुसळधार पावसात आठवडे बाजार परिसरातील जिवंत वीजतार रस्त्यावर; पथकाने तातडीने वीजपुरवठा बंद करून दुरुस्ती पूर्ण केली
नशिराबाद | । प्रतिनिधी
नशिराबाद येथे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आठवडे बाजार परिसरात मुख्य वीजवाहिनीची जिवंत तार तुटून रस्त्यावर पडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवत तुटलेली वीजतार दुरुस्त केल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे मुख्य वीजवाहिनीची तार तुटून रस्त्यावर तसेच साचलेल्या पाण्यात पडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून तातडीने महावितरणला याची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी पवन वाघुळदे आणि त्यांचे पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वप्रथम वीजप्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर आवश्यक सुरक्षेची काळजी घेत तुटलेली वीजतार युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात आली.
सतत सुरू असलेल्या पावसातही कर्मचाऱ्यांनी धाडसाने काम करत अल्पावधीतच वीजपुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली असून परिसरातील जनजीवनही लवकर सुरळीत झाले.
महावितरणच्या या तत्पर सेवेमुळे आठवडे बाजार परिसरातील नागरिक, व्यापारी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले. संकटाच्या काळात वेळेवर मदतीसाठी धावून आल्याबद्दल नागरिकांनी महावितरण कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
