Spread the love

भवरखेडे–पळासखेडे संपर्क मार्ग काही तास खंडित; जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने तात्पुरती दुरुस्ती, नवीन पुलासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा

अजय बाविस्कर | प्रतिनिधी, भवरखेडे

धरणगाव तालुक्यातील भवरखेडे गावाजवळील नदीवरील जुन्या पुलाचा काही भाग मुसळधार पावसामुळे खचल्याने भवरखेडे–पळासखेडे हा महत्त्वाचा संपर्क मार्ग काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला होता. नदीला आलेल्या पुरामुळे पुलाची दुरवस्था झाल्याने नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ग्रामपंचायतीने तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करून अवघ्या काही तासांत पुलाची तात्पुरती डागडुजी करत वाहतूक पूर्ववत केली.

भवरखेडे नदीवरील जुना पूल खचला

सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आणि जुन्या पुलाचा काही भाग खचला. त्यामुळे दोन्ही गावांमधील संपर्क तुटल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्या शाळेत जाण्या-येण्यासह अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत भवरखेडे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने खचलेल्या भागात माती व खडी टाकून पुलाची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्थानिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कामानंतर मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

दरम्यान, या घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून लवकरच घटनास्थळी पाहणी करण्यात येणार असून, या ठिकाणी नवीन पुलाच्या उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही तातडीने सुरू करण्यात येईल, अशी माहिती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

ग्रामपंचायतीने वेळेवर केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी गैरसोय टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी मजबूत पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version