Spread the love

गोपी नदीला पूर, घरांमध्ये पाणी; कापूस, मका, तूर, ज्वारीसह अनेक पिके बाधित, पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

रत्नापिंप्री (ता. पारोळा) | वार्ताहर : किशोर वाघ

पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्रीसह दबापिंप्री, होळपिंप्री, नेरपाट, चिखलोद, बोदर्डे, भोकरबारी, भिलाली आणि कंकराज परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रभर आणि दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक शेतांमधून नाल्याचे पाणी वाहून गेल्याने उभी पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीमुळे गोपी नदीला पूर आला असून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक जुनी व जीर्ण घरे कोसळल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका खरीप हंगामातील कापूस, मका, तूर, ज्वारी, बाजरी, उडीद आणि मूग या पिकांना बसला आहे. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचले असून पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला समाधान व्यक्त केले होते. मात्र, पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसाने परिस्थिती बदलली आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान, सततच्या पावसामुळे अनेक रस्त्यांवरून पाणी वाहिल्याने रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीचे त्वरित सर्वेक्षण करून मदत देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version