Spread the love

जन्मदात्या बापाचे क्रौर्य! झोपेतच दोन लेकरांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

दारूच्या नशेत हल्ल्याचा संशय; जंगलात पळालेल्या आरोपीला अडावद पोलिसांनी घेतले ताब्यात

चोपडा | राहुल  पाटील  प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात जन्मदात्या बापाने आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या हल्ल्यात १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत मुलीचे नाव मीरा सुभाष भिलाला (वय १३) असून जखमी मुलगा रामू सुभाष भिलाला (वय ११) याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणातील आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) हा घटना घडल्यानंतर जंगलाच्या दिशेने फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण शोधले जात आहे.

झोपेत असतानाच केला जीवघेणा हल्ला

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुले घरात झोपेत असताना आरोपीने कुऱ्हाडीने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता.

घटनेमागील कारणांचा शोध

हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार आरोपीला दारूचे व्यसन असल्याची माहिती समोर येत असून, कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करत आहेत.

गावात शोककळा; तपास सुरू

या अमानुष घटनेमुळे वडती गावासह संपूर्ण परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे. अडावद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुरावे संकलित केले असून आरोपीविरुद्ध खुनासह अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version