जे. जे. रुग्णालयात खळबळ; अस्थिरोग विभागातील प्राध्यापकाविरोधात गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी
निवासी डॉक्टरांकडून आर्थिक व मानसिक छळ, बनावट सह्या आणि उपचारातील कथित हलगर्जीपणाचे गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
मुंबई | विक्रांत पाटील
मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (ऑर्थोपेडिक्स) विभागातील एका वरिष्ठ प्राध्यापकाविरोधात निवासी डॉक्टरांनी विविध गंभीर आरोप करत लेखी तक्रारी दाखल केल्याचा दावा समोर आला आहे. संबंधित प्राध्यापक डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ, विद्यार्थ्यांच्या सह्यांबाबत कथित अनियमितता तसेच एका रुग्णाच्या उपचारातील कथित हलगर्जीपणाबाबत आरोप करण्यात आले असून या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी १५ कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांकडे सादर केलेल्या पत्रात डॉ. महाजन यांच्याकडून वैयक्तिक खर्च निवासी डॉक्टरांवर टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. महागड्या भेटवस्तू, घड्याळे, इयरफोन्स तसेच विविध कार्यक्रमांच्या खर्चासाठी आर्थिक दबाव आणला जात असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय, ५ मार्च २०२६ रोजी निवासी डॉक्टर डॉ. रौनक सिन्हा यांनी सादर केलेल्या स्वतंत्र निवेदनात वैयक्तिक कामांसाठी दबाव आणला जात असल्याचा आणि त्यामुळे मानसिक तणाव निर्माण झाल्याचा आरोप केल्याचे सांगितले जात आहे. अशा मागण्यांना विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तरावर त्रास दिला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
रुग्णाच्या उपचारांबाबतही आरोप
तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी गंभीर जखमी भास्कर मुगम यांना वेळेत दाखल करून उपचार देण्यात आले नाहीत, तसेच इतर रुग्णालयात पाठविण्यात आल्यामुळे उपचारास विलंब झाला, असा आरोप करण्यात आला आहे. या कथित विलंबामुळे रुग्णाचा पाय कापावा लागला आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा संबंधित घटना अहवालात करण्यात आला असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असून, संबंधित घटनांबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत.
बनावट सह्यांचा कथित आरोप
५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) समोर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय पदव्युत्तर मार्गदर्शक बदलण्यासाठी त्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विभागातील कार्यपद्धतीबाबतही काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविल्याचा दावा करण्यात आला आहे.
२०१९ मधील चौकशीचा उल्लेख
तक्रारीत २०१९ मधील एका चौकशी अहवालाचाही उल्लेख करण्यात आला असून, त्यावेळी एका विद्यार्थ्याच्या मूल्यमापनासंदर्भात अनियमिततेचे निरीक्षण नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
निष्पक्ष चौकशीची मागणी
संबंधित सर्व तक्रारी, निवेदने आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात डॉ. नितीन महाजन किंवा जे. जे. रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यांची बाजू समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.
