Spread the love

खर्डा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात; भव्य रक्तदान शिबिरात ८७ जणांचे रक्तदान

वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि समाजोपयोगी उपक्रमांनी जयंतीला सामाजिक सेवेची जोड

अहिल्यानगर | प्रतिनिधी – बापुसाहेब घोडेस्वार

जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ८७ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, सामाजिक कार्यकर्ते अभी मिसाळ, विशाल पवार, ग्रामपंचायत सदस्य दादा जावळे यांच्यासह मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी नीता इंगळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार बाळासाहेब शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन भीमा घोडेराव यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

जयंतीनिमित्त सुरभी ब्लड सेंटर, अहिल्यानगर आणि जामखेड ब्लड स्टोरेज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. विकास जरे व सहकारी यांच्या पुढाकारातून स्वर्गीय लखन मिसाळ यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ८७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले.

यावेळी दिवंगत अमोल मोरे तसेच मार्केट कमिटीचे संचालक वैजीनाथ पाटील यांचे वडील कै. पोपट लोंढे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, खर्डाचे शहराध्यक्ष गणेशभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीनिमित्त वृक्षारोपण तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमास पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के, विलास जाधव, अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे, युवा ढावरे, मदन पाटील, दीपक जावळे, भीमराव घोडेराव, अखिलेश शिंदे, अलीशेर कुरेशी, जितेंद्र पगारे, शंकर गायकवाड, लखन जाधव, दादा मोरे, समाधान जाधव, अंकुश डाडर, आतिश जाधव, किरण गायकवाड, नितीन आहेर, कृष्णा आलाट, कृष्णा थोरात, प्रवीण सदाफुले, अजय जाधव यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान, वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासारखे उपक्रम राबविल्याबद्दल या कार्यक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version