Spread the love

रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था; उपचार कक्षात पावसाचे पाणी, रुग्णांची गैरसोय

नवीन इमारत पूर्ण असूनही इलेक्ट्रिक फिटिंगचे टेंडर रखडले; कोट्यवधींची इमारत वापराविना, ग्रामस्थांकडून तातडीने सुरू करण्याची मागणी

रतन अडकमोल एरंडोल तालुका | ग्रामीण प्रतिनिधी

रिंगणगाव येथील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपचार कक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागत असल्याने रुग्णांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात छतामधून सतत पाणी गळत असल्याने उपचार कक्षात रुग्णांना ठेवणेही कठीण होत असून, आरोग्य सेवांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.

आरोग्य विभागाकडून उपचार कक्षाच्या छताची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीनंतरही गळती थांबलेली नसल्याने समस्या कायम आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, रिंगणगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, इमारतीतील इलेक्ट्रिक फिटिंगच्या कामासाठीचे टेंडर रखडल्यामुळे ही इमारत अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही. संबंधित विभागाने या कामासाठी दुसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली असली, तरी प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

परिणामी, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली सुसज्ज इमारत वापराविना पडून आहे, तर दुसरीकडे रुग्णांना गळक्या आणि जीर्ण इमारतीत उपचार घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती नागरिकांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरत आहे.

रिंगणगाव व परिसरातील ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून आरोग्य सेवा नव्या इमारतीत सुरू करण्याची मागणी केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version