पारोळ्यात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
आमदार ॲड. अमोल पाटील यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन; सामाजिक समता व बंधुतेचा संदेश
पारोळा | सुरेश पाटोळे (प्रतिनिधी)
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पारोळा शहरातील अमळनेर चौफुली लगत असलेल्या त्यांच्या पुतळ्यास आमदार ॲड. अमोल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार ॲड. अमोल पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा उल्लेख करत, “ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नव्हे, तर कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा विचार आजही कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाच्या स्वाभिमानाचा बुलंद आवाज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी नगराध्यक्ष दयारामअण्णा पाटील, शिवसेना शहरप्रमुख तथा गटनेते अमृतभाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, राजूभाऊ कासार, शिवसेना उपगटनेते पंकजभाऊ मराठे, शिवसेना प्रतोद नितीनभाऊ सोनार, नगरसेवक नजीरखान बेलदार, युवासेना शहरसंघटक प्रशांत पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून समाजातील अन्याय, विषमता, दारिद्र्य आणि शोषणाविरोधात उभारलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. कष्टकरी, शेतमजूर, कामगार, दलित आणि वंचित समाजाच्या वेदनांना त्यांनी आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडत सामाजिक समता, बंधुता, स्वाभिमान आणि मानवतेचा संदेश दिला, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविले. प्रत्येकाला समान संधी, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि न्यायपूर्ण समाजव्यवस्था निर्माण व्हावी, हा त्यांच्या विचारांचा मूलमंत्र आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत सामाजिक समता, शिक्षण, बंधुता आणि न्यायपूर्ण समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या विचारांचा प्रकाश समाजाला सदैव दिशा देत राहो, अशी भावना व्यक्त करत जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
