पीक विमा अर्जासाठी १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
तांत्रिक अडचणी आणि अल निनोच्या पार्श्वभूमीवर निर्णय; अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
पारोळा | सुरेश पाटोळे (प्रतिनिधी)
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्जाची अंतिम मुदत १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ होती. मात्र, तांत्रिक अडचणी, संकेतस्थळावरील संथ गती आणि इंटरनेट समस्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता न आल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
अल निनोच्या संभाव्य संकटाचा विचार करून राज्यातील एकही पात्र शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन तातडीने अर्ज सादर करावेत, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.
पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. तर पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनी PMFBY पोर्टल किंवा PMFBY Crop Insurance मोबाईल ॲपच्या माध्यमातून अथवा जवळच्या सीएससी (CSC) सेवा केंद्रावर जाऊन अर्ज भरावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी, इंटरनेटचा कमी वेग आणि इतर कारणांमुळे अनेक पात्र शेतकरी अर्जापासून वंचित राहिले होते. त्यामुळे शासनाने अर्जासाठी अतिरिक्त मुदत देण्याचा निर्णय घेतला.
राज्यात सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर विभागातून १३ लाख २५ हजार, त्यानंतर अमरावती विभागातून ६ लाख ९१ हजार ९७३, पुणे विभागातून ६ लाख ७ हजार ६६३, नागपूर विभागातून ४ लाख ५३ हजार ३८३, नाशिक विभागातून ३ लाख ३३ हजार ३८५, लातूर विभागातून २ लाख ४२ हजार ८२६, कोल्हापूर विभागातून २ लाख ४० हजार २५३ आणि कोकण विभागातून १ लाख २ हजार ३३५ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे.
राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून वाढीव मुदतीचा लाभ घेण्यास विलंब करू नये, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
