‘उजेड पेरणारी माणसं’ पुस्तकावर भडगावात वाचक कट्टा; समाजप्रबोधनाचा संदेश
जागृती वाचनालयात साहित्यिक चर्चेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पत्रकार संजय पवार यांच्याकडून पुस्तक भेट
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
भडगाव शहरातील जागृती मित्र मंडळ संचलित जागृती वाचनालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेला ‘वाचक कट्टा’ हा साहित्यिक उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात पत्रकार संजय पवार यांनी भुसावळ येथील लेखक आनंदा पाटील लिखित बहुचर्चित ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक वाचनालयाला भेट देत उपस्थित वाचकांसमोर पुस्तकाचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पवार यांनी पुस्तकाला देवा झिंजाड यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील विचार आणि लेखकाच्या ‘अंतरीचे बोल’ या मनोगतातील भावना प्रभावीपणे उलगडून सांगितल्या. वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पुस्तक लेखन पूर्ण करणाऱ्या लेखकाच्या जिद्दीचा उल्लेख करत त्यांनी आधुनिक काळातील कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण मांडले.
‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकात विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या ८४ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आला आहे. त्यापैकी काही निवडक व्यक्तींच्या कार्याचा परिचय करून देताना संजय पवार यांनी त्यांच्या समाजोपयोगी कार्याची माहिती उपस्थितांना दिली. समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींची माहिती प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी, “या पुस्तकातील प्रत्येक शब्द हा समाजासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली आहे. प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे,” असे आवाहन केले.
या साहित्यिक चर्चेमुळे उपस्थित वाचकांना पुस्तकातील विचार, समाजकार्याची प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा परिचय झाला. कार्यक्रमात पुस्तकातील विविध प्रसंगांवरही उपस्थितांनी मनमोकळी चर्चा केली.
यावेळी जागृती मित्र मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश भंडारी, सचिव प्रा. दीपक मराठे, प्रा. दिनेश तादळे, प्रा. भगाळे, मुख्याध्यापक सुरेश रोकडे, डॉ. दुर्गेश रूले, सेवानिवृत्त प्राध्यापक पाटील, प्रा. अतुल देशमुख, नागेश वाघ, विजय देशपांडे, चव्हाण सर, प्रतिभा कुलकर्णी, कालिंदी सहस्रबुद्धे, देशमुख मॅडम, देशपांडे मॅडम यांच्यासह महिला वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्याच्या माध्यमातून समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देणारा हा ‘वाचक कट्टा’ उपक्रम उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडला.
