कोरपावली शिवारात सागवान लाकडासह दुचाकी जप्त; आरोपी फरार
वनविभागाची मध्यरात्री कारवाई; ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार झाल्याने तपासाबाबत प्रश्नचिन्ह
यावल | प्रतिनिधी : हर्षल पाटील
यावल पश्चिम वनविभागाच्या पथकाने हरिपुरा-कोरपावली रस्त्यावर गस्तीदरम्यान कारवाई करत सागवान लाकूड व दुचाकीसह सुमारे ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
माहितीनुसार, १ ऑगस्टच्या रात्री वनविभागाचे पथक हरिपुरा-कोरपावली मार्गावर गस्त घालत असताना संशयित दुचाकीस्वाराचा पाठलाग करण्यात आला. वनकर्मचाऱ्यांची चाहूल लागताच संबंधिताने सुमारे ४२ हजार रुपये किमतीची दुचाकी आणि अंदाजे २ हजार रुपये किमतीचे सागवान लाकडाचे चार चौपट घटनास्थळी टाकून पलायन केले.
या प्रकरणी हरिपुरा वनरक्षकांनी वनगुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अशा कारवायांमध्ये वारंवार केवळ मुद्देमाल जप्त होतो, मात्र आरोपी हाती लागत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. परिसरात जुन्या परवान्यांचा गैरवापर करून नव्याने तोडलेल्या सागवान लाकडापासून बेकायदेशीररीत्या फर्निचर तयार केले जात असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे संबंधित तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
