पूरग्रस्तांच्या मदतीला धावला जीपीएस ग्रुप; ममुराबादच्या भिल्ल वस्तीतील १०८ नागरिकांना किराणा किटचे वाटप
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मदत; प्रतापराव पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिला दिलासा
ममुराबाद / पाळधी | प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचा मोठा फटका नाल्यालगतच्या भिल्ल वस्तीला बसला. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य, घरगुती साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या संकटग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी जीपीएस ग्रुपने पुढाकार घेत १०८ पूरग्रस्त नागरिकांना किराणा किटचे वाटप केले.
गावचे सरपंच व ग्रामस्थांनी पूरस्थितीची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांना दिल्यानंतर, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस ग्रुपने तातडीने मदतकार्य सुरू केले. तयार करण्यात आलेल्या किराणा किटचे वितरण प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
मदत वाटपापूर्वी प्रतापराव पाटील यांनी भिल्ल वस्तीतील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी घरांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच बाधित घरे, रस्ते आणि परिसराची पाहणी करून पूरग्रस्तांना धीर दिला.
यावेळी प्रतापराव पाटील म्हणाले, “संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच खरी समाजसेवा आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएस ग्रुपने मदत साहित्याबरोबरच संकटात आपण एकटे नाही, हा विश्वासही पूरग्रस्त कुटुंबांना दिला आहे. समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने अशा वेळी मदतीचा हात पुढे करणे हीच खरी माणुसकी आहे.”
या प्रसंगी ममुराबादचे उपसरपंच विलास सोनवणे, युवा सेनेचे किरण पाटील, राहुल ढाके, किरण पुंडलिक पाटील, गोपाल मोरे, लक्ष्मीबाई भिल्ल, वासुदेव ढाके, चंदू नाना पाटील, सुनीलभाऊ वाघोडे, प्रमोदभाऊ शिंदे, मुकुंद मुंदडा, तुरखेडाचे सरपंच नितीन सपकाळे, पत्रकार सचिनभाऊ पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी युवा सेनेचे किरण पाटील यांनी गावकऱ्यांच्या वतीने जीपीएस ग्रुप, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि प्रतापराव पाटील यांचे आभार मानले. या मदतीमुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
