Spread the love

भंडाऱ्यात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी

सामाजिक उपक्रम, अभिवादन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती सोहळा; अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार

भंडारा | प्रतिनिधी

‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था, भंडारा’ यांच्या वतीने जगतविख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती विविध सामाजिक उपक्रम, अभिवादन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. १ ऑगस्ट रोजी जेलरोड येथील ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक’ येथे सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा जयंती सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मधुराताई मदनकर यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थान विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी भूषविले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर करत समाजाला प्रेरणा देणाऱ्या कार्याचे स्मरण केले.

कार्यक्रमाला आमदार नरेंद्र भोंडेकरआमदार राजूभाऊ कोरेमारेभगवानजी गायधने गुरुजीमहालगावे सर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. वक्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या जीवनाचे वास्तव प्रतिबिंब असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.

या जयंती सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ ढोके, उपाध्यक्ष ईश्वरजी कांबळे, सचिव बाबासाहेब जाधव, कोषाध्यक्ष किशोर खंडाळे, सहसचिव राजेश खडसे, संघटक अनिल बावणे यांनी नियोजनाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रम संयोजक म्हणून राहुलजी लोखंडे, अनुपजी ढोके आणि कृष्णाजी खडसे यांनी सक्रिय भूमिका बजावली.

यावेळी जिल्हा लहुजी सेना अध्यक्ष नामदेवजी निखाडे, महिला अध्यक्षा संगीता बावणे, सोशल मीडिया प्रमुख फकिराजी खडसे यांच्यासह संस्थेचे कार्यकारिणी सदस्य जयराम बावणे, दिनेश हापसे, राहुल डोंगरे, रामुजी बावणे, लोकेश डोंगरे, सेवाबाई जाधव तसेच मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि अण्णाभाऊ साठे प्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक समतेच्या विचारांचा जागर करण्यात आला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि परिवर्तनाची चळवळ अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version