Spread the love

भवरखेडेत नदीचे पाणी शेतात शिरले; उभ्या कापूस पिकाचे मोठे नुकसान

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात; तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

धरणगाव | प्रतिनिधी (अजय बाविस्कर)

धरणगाव तालुक्यातील भवरखेडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून, नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरल्याने उभ्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भवरखेडे येथील शेतकरी युवराज बन्सी माळी आणि रमेश धुडकू पाटील यांच्या शेतांमध्ये नदीचे पाणी घुसल्याने कापसाची झाडे अनेक तास पाण्याखाली राहिली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

यंदा चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच स्वतःची बचत खर्च करून बियाणे, खते, औषधे, मशागत, पेरणी आणि तणनियंत्रणावर मोठी गुंतवणूक केली होती. वेळोवेळी शेतीची योग्य निगा राखल्यामुळे कापसाचे पीक चांगल्या अवस्थेत होते. मात्र, अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने काही तासांतच शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला दिसून आला. अनेक ठिकाणी कापसाची झाडे आडवी पडली असून काही ठिकाणी झाडांची मुळे कुजण्यास सुरुवात झाली आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच संबंधित तलाठी जीवनकुमार खोकले व कोतवाल महेंद्र पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली. शासनाकडून आदेश प्राप्त होताच तातडीने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जाईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शेतकरी युवराज माळी आणि रमेश पाटील यांनी आपली व्यथा प्रशासनासमोर मांडत तातडीने मदतीची मागणी केली. परिसरातील इतर अनेक शेतांमध्येही नदीचे पाणी घुसल्याने केवळ कापूसच नव्हे तर इतर खरीप पिकांनाही मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. वाढलेला शेतीचा खर्च, कर्जाचा बोजा आणि आता झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, पीकविमा योजनेअंतर्गत मदत त्वरित वितरित करावी तसेच विशेष आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनीही व्यक्त केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version