पत्रकार संजय पवार यांनी पुस्तक वाचनालयाला भेट देत मांडला समाजप्रबोधनाचा संदेश; कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा प्रेरक दस्तऐवज असल्याचे प्रतिपादन
भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ)
भडगाव शहरातील जागृती मित्र मंडळ संचलित जागृती वाचनालयात आयोजित करण्यात आलेला ‘जागृती वाचक कट्टा’ हा उपक्रम शनिवारी उत्साहात पार पडला. या उपक्रमात पत्रकार संजय पवार यांनी भुसावळ येथील लेखक आनंदा पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ हे बहुचर्चित पुस्तक जागृती वाचनालयाला भेट देत त्यावरील सखोल आणि प्रेरणादायी चर्चा घडवून आणली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पवार यांनी पुस्तकाला पुण्यातील पेन प्रकाशनचे देवा झिंजाड यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील विचार आणि लेखकाच्या ‘अंतरीचे बोल’ या मनोगताचा परिचय उपस्थितांना करून दिला. या मनोगतातील आशय स्पष्ट करताना त्यांनी रामायणातील श्रीरामाने पित्याचे वचन पाळण्यासाठी वनवास स्वीकारला, त्याचप्रमाणे लेखक आनंदा पाटील यांनी आपल्या वडिलांना दिलेला पुस्तक लेखनाचा शब्द पूर्ण करून आधुनिक काळातील कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण घालून दिल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी पुस्तकात समाविष्ट असलेल्या ८४ ‘उजेड पेरणाऱ्या’ व्यक्तींपैकी काही निवडक व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा परिचय करून दिला. प्रतिकूल परिस्थितीतही समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या या व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
“आपल्या आजूबाजूला समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणारी अनेक माणसे असतात. त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ‘उजेड पेरणारी माणसं’ हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावे. या पुस्तकातील प्रत्येक शब्द हा स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा कृतज्ञ दस्तऐवज आहे,” असे प्रतिपादन संजय पवार यांनी केले.
या वाचक कट्ट्यामुळे उपस्थित वाचकांना पुस्तकातील प्रेरणादायी विचार, समाजसेवेची मूल्ये आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांचा जवळून परिचय झाला. साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला जागृती मित्र मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश भंडारी, सचिव प्रा. दिपक मराठे, प्रा. दिनेश तादळे, प्रा. भगाळे, मुख्याध्यापक सुरेश रोकडे, डॉ. दुर्गेश रूले, सेवानिवृत्त प्राध्यापक पाटील, प्रा. अतुल देशमुख, नागेश वाघ, विजय देशपांडे, चव्हाण सर, प्रतिभा कुलकर्णी, कालिंदी सहस्रबुद्धे, देशमुख मॅडम, देशपांडे मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी व महिला वाचक उपस्थित होते.
