Spread the love

प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ)

दुःखाला समाजसेवेची दिशा मिळाली तर स्मृती चिरंतन होतात, याची भावस्पर्शी प्रचिती भडगाव तालुक्यातील चामकवाडी (कजगाव) येथे पाहायला मिळाली. दिवंगत दुर्गेश भानुदास महाजन यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद वस्तीशाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत रेनकोट वाटप आणि वृक्षारोपण या समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आली.

माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार भानुदास हिलाल महाजन यांनी सहकाऱ्यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत ये-जा करता यावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना दर्जेदार रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शाळा परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून “एक झाड – एक जबाबदारी” हा पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सादिक गणी मन्यार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद लालवाणी, सरपंच विजय गायकवाड, पत्रकार बी. बी. भोसलेनिलेश महालेदिपक अमृतकरअमीन पिंजारीसमाधान पाटीलआशुतोष पाटीलश्रेयश कासारनितीन पाटील, माजी उपसरपंच शिवप्रसाद भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वसंत पाटील यांनी केले. समाजाच्या सहकार्यामुळे शाळेचा सर्वांगीण विकास शक्य होत असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत सामाजिक जाणीव आणि पर्यावरणाबाबतची संवेदनशीलता विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक बालू सोनवणेएकनाथ भोईनिल चौधरीसोपान महाजन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी दिवंगत दुर्गेश महाजन यांच्या स्मृतींना अभिवादन करत महाजन कुटुंबाने दुःखाचे रूपांतर समाजसेवेत केले, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

रेनकोट वाटपामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाणे अधिक सुरक्षित होणार असून, वृक्षारोपणामुळे शाळेचा परिसर अधिक हिरवागार होण्यास हातभार लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.

“फुलांचा हार काही क्षणात कोमेजतो; पण एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि लावलेल्या झाडाचा वाढता हिरवा श्वास हीच दिवंगत व्यक्तीला वाहिलेली सर्वात जिवंत श्रद्धांजली ठरते.”

Share.
Leave A Reply

Exit mobile version