अतिवृष्टीग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार; नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करा : आ. किशोर पाटील
पाचोरा-भडगाव तालुक्यात अभूतपूर्व नुकसान; शेतकरी, व्यापारी व नागरिकांना १०० टक्के मदत मिळवून देण्याची ग्वाही
भुवनेश्वर दुसाने पाचोरा| प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जळगाव जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात मुसळधार पावसामुळे शेती, व्यापार, उद्योग-व्यवसाय तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, असे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
शिवसेना कार्यालयात आयोजित तातडीच्या पत्रकार परिषदेत आमदार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बाजार समिती सभापती गणेश पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, माजी उपनगराध्यक्ष बंडू चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
२५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रथमच एवढे मोठे नुकसान
यावेळी बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले, “मी गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान यापूर्वी कधी पाहिले नाही. मागील दोन दिवसांपासून झालेल्या सततधार आणि मुसळधार पावसाने पाचोरा व भडगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.”
पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. धान्य, जीवनावश्यक वस्तू, व्यावसायिक साहित्याचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पशुधन वाहून गेले आहे. शेतजमिनी खरडून गेल्या असून कापूस, मका, सोयाबीन यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
भडगाव तालुक्यात सर्वाधिक फटका
आमदार पाटील यांनी सांगितले की, भडगाव तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. पेंडगाव, बातसर परिसरात अचानक मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतांमध्ये, घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
“पूरसदृश परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी मी स्वतः आणि स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला. प्रशासनाशी समन्वय साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
कॅनॉलमधून पाणी सोडण्याबाबत जलसंपदा मंत्र्यांशी चर्चा
काही भागांत सिंचन विभागाकडून अचानक कॅनॉलमधून पाणी सोडण्यात आल्याने बंधाऱ्याला भगदाड पडल्याचा मुद्दाही आमदार पाटील यांनी उपस्थित केला. याबाबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याने परिस्थितीचा विचार करून पुढील काळात कॅनॉलमधून पाणी सोडण्याचे आदेश देऊ नयेत, अशी विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार
महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागात जाऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील.
“पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. शासनाकडून नुकसानग्रस्तांना १०० टक्के आर्थिक नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे,” अशी ग्वाही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी दिली.
