अतिवृष्टीग्रस्त पारोळा तालुक्याची मंत्र्यांकडून पाहणी; स्वतंत्र पंचनामे व खचलेल्या पुलाचे काम तातडीने करण्याचे निर्देश
पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा बाधित गावांचा दौरा; शेतकरी व नागरिकांना लवकर मदत देण्याचे प्रशासनाला आदेश
पारोळा | प्रतिनिधी (जिमाका)
पारोळा तालुक्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी देवगाव, तामसवाडी आणि मुंदाणे (प्र.) या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेत प्रशासनाला तातडीने स्वतंत्र पंचनामे करून बाधितांना जलद मदत देण्याचे निर्देश दिले.
बोरी नदी परिसराची पाहणी; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या
पाहणी दौऱ्याची सुरुवात देवगाव येथील बोरी नदी परिसरातून करण्यात आली. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठील शेती, उभी पिके आणि शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी स्थानिक शेतकरी व नागरिकांनी मंत्र्यांसमोर आपल्या अडचणी मांडत नुकसानभरपाईची मागणी केली. पुराच्या पाण्यामुळे शेतीबरोबरच अनेक घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने मंत्र्यांना दिली.
स्वतंत्र पंचनाम्यांचे आदेश
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना घरांची पडझड, शेती पिकांचे नुकसान तसेच पाणी शिरून बाधित झालेल्या घरांचे स्वतंत्र पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांचा अहवाल निर्धारित मुदतीत सादर करून नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषांनुसार मदत मिळण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रशासनाने कोणताही बाधित नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले.
मुंदाणे येथील खचलेल्या पुलाची पाहणी
दौऱ्यादरम्यान मंत्र्यांनी मुंदाणे येथील खचलेल्या पुलाचीही पाहणी केली. पुलाचे नुकसान गंभीर स्वरूपाचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला विशेष योजनेअंतर्गत पुलाचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. या पुलाची दुरुस्ती झाल्यास परिसरातील वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीच्या सूचना
पाहणीवेळी आमदार ॲड. अमोल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार उल्हास देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाविस्कर, पोलीस निरीक्षक दीपक पाटील तसेच कृषी विभाग, पंचायत समिती आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्र्यांनी सर्व संबंधित विभागांना समन्वयाने काम करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. तसेच पंचनाम्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून शासनाच्या मदतीचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत लवकर पोहोचविण्याचे निर्देशही दिले.
