Spread the love

निंबा देवी धरण ओव्हरफ्लो! निसर्गरम्य वातावरणाने पर्यटकांना घातली भुरळ

सुरक्षेच्या कारणास्तव धरण परिसर सध्या बंद

तालुका यावल, जिल्हा जळगाव :  प्रतिनिधी हर्षल पाटील

यावल तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात वसलेले प्रसिद्ध *’निंबा देवी धरण’* सध्या तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे निसर्गाचे एक अलोकिक रूप येथे पाहायला मिळत आहे. हे धरण प्रसिद्ध *श्री मनुदेवी देवस्थान (आडगाव) पासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर* असल्याने मनुदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे आणि पर्यटकांचे हे आवडते ठिकाण मानले जाते.

धरणाला पायऱ्यांची अत्यंत आकर्षक रचना असल्यामुळे पायऱ्यांवरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्याच्या तुषारांचा आणि ओव्हरफ्लोचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत आहे. हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि पायऱ्यांवरून वाहणारे पाणी यामुळे येथील सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे.

*सुरक्षेचा उपाय: पर्यटकांसाठी धरण परिसर काही दिवस बंद*

परिसरात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत आणि ओव्हरफ्लोच्या वेगात मोठी वाढ झाली आहे. संभाव्य धोका टळावा आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून *निंबा देवी धरण परिसर काही दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.*

*प्रशासनाचे आवाहन:*

मुसळधार पाऊस आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह लक्षात घेता पर्यटकांनी धरणाच्या परिसरात जाण्याचा अट्टाहास करू नये. प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर आणि परिस्थिती सामान्य झाल्यानंतर धरण परिसर पर्यटकांसाठी पुन्हा पूर्ववत खुला केला जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version