ग्रामीण आरोग्य सेवांसाठी आ. अमोल पाटील यांचा पुढाकार; कासोदा ग्रामीण रुग्णालय व ब्राम्हणे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत मुंबईत चर्चा; कासोदा पीएचसीचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन आणि ब्राम्हणे येथे नवीन आरोग्य केंद्राची मागणी
एरंडोल | प्रतिनिधी :
एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार करण्यासाठी आमदार अमोल पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन विविध महत्त्वाच्या आरोग्यविषयक मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासह ब्राम्हणे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीत कासोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. ही मागणी मंजूर झाल्यास कासोदा व परिसरातील हजारो नागरिकांना अत्याधुनिक आणि तातडीच्या आरोग्य सेवा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होतील. त्यामुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी दूरच्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही आणि ग्रामीण नागरिकांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत होणार आहे.
याशिवाय ब्राम्हणे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. हे केंद्र सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचार, माता-बाल आरोग्य सेवा, लसीकरण, नियमित आरोग्य तपासणी तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळावी तसेच भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार व्हावा, या उद्देशाने या मागण्या करण्यात आल्याचे आमदार अमोल पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोन्ही मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आश्वासन देत संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
आरोग्य सुविधा हा ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा पाया असून एरंडोल-पारोळा मतदारसंघातील नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील, अशी ग्वाही आमदार अमोल पाटील यांनी दिली.
