तहसीलदार डी. पी. सपकाळे हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधारांना तातडीने अटक करा; कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पोलीस प्रशासनाला निवेदन
अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्याकडे निवेदन; उर्वरित आरोपींविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन
भाऊ सपकाळे जळगाव | प्रतिनिधी :
बोदवडचे तहसीलदार डी. पी. सपकाळे यांच्यावर कथित वाळू माफियांनी केलेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह अद्याप फरार असलेल्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
पोलीस अधीक्षकांच्या अनुपस्थितीत हे निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांना सादर करण्यात आले. निवेदनात हल्ला प्रकरणातील केवळ एका आरोपीवर कारवाई करून चालणार नाही, तर संपूर्ण कट रचणाऱ्या मुख्य सूत्रधारांसह सर्व संबंधित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
निवेदनाची गंभीर दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी निवेदनाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपस्थित प्रतिनिधींसमोरच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच बोदवड पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकरणाचा आढावा घेतला. तसेच तपासाला गती देत आवश्यक ती कठोर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हल्ला प्रकरणातील उर्वरित आरोपींविरुद्धही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल, सहसचिव रवींद्र गायकवाड, मनपा कार्याध्यक्ष नंदू गायकवाड, किशोर महिराळे, महेश सपकाळे, दिलीप मोरे यांच्यासह विविध विभागांतील पदाधिकारी उपस्थित होते.
हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून दोषींना कठोर शिक्षा मिळावी, तसेच महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
