Spread the love

आरक्षण उपवर्गीकरण विरोधी अभियानाला रावेर तालुक्यात वेग; १० ऑगस्टच्या मोर्चासाठी गावोगावी जनजागृती

सामाजिक कृती समितीचा व्यापक प्रचार; संविधानिक आरक्षणाच्या समर्थनार्थ नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

बैठका, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष संवादातून जनजागृती; समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रावेर | प्रतिनिधी : प्रदीप खैरे

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी सामाजिक कृती समिती, रावेर तालुका’ यांच्या वतीने तालुकाभर व्यापक प्रचार अभियान राबविण्यात येत आहे. आगामी १० ऑगस्ट २०२६ रोजी रावेर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर समितीचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत असून अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मोर्चाच्या तयारीचा भाग म्हणून तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठका, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष भेटीगाठी आयोजित करण्यात येत आहेत. या माध्यमातून आरक्षण उपवर्गीकरणाचे संभाव्य परिणाम, संविधानिक आरक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक हक्कांविषयी नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. समाजातील विविध घटक या अभियानात सक्रियपणे सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानिक आरक्षणाचे संरक्षण आणि सामाजिक एकजूट अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक समाजबांधवाने १० ऑगस्ट रोजी रावेर येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, या जनजागृती अभियानात निःस्वार्थपणे सहभागी होऊन गावोगावी प्रचार-प्रसार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवा पदाधिकाऱ्यांचे कृती समितीच्या वतीने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version