Spread the love

धुळे शहर खड्ड्यांच्या विळख्यात; रस्त्यांची दुरवस्था पाहून नागरिक संतप्त

रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते? व्यापाऱ्यांसह वाहनधारक त्रस्त; प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनधारक आणि व्यापाऱ्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि विविध विकासकामांनंतर रस्ते पूर्ववत न केल्याने शहरात “रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते?” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, चाळीसगाव चौफुली मार्ग, ८० फूट रोड, पारोळा रोड, देवपूर यांसह अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गांवरून प्रवास करताना दुचाकीस्वार, चारचाकी चालक तसेच पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक लहान-मोठे अपघात घडत असून, वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

विशेषतः पेठ भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये व्यापाऱ्यांची मालवाहू वाहने अडकत असल्याने व्यापारावरही परिणाम होत आहे. ग्राहकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत असून, व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र, खोदकाम झालेल्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना, सूचना फलक किंवा संरक्षक बॅरिकेड्स नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका अधिक वाढला असून, संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.

या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गायकवाड आणि भूपेश शर्मा यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. शहरातील खड्डे तातडीने बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, उत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची दुरवस्था कायम राहिल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, सर्व प्रमुख रस्त्यांची पाहणी करून दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहराच्या विकासाच्या दाव्यांदरम्यान रस्त्यांची झालेली ही अवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. आता प्रशासन आणि संबंधित कंत्राटदार तातडीने ठोस पावले उचलतात की नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागते, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version