गारपीडग्रस्त शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित; राष्ट्रवादी (शरद पवार) व शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन
मार्च महिन्यातील गारपीटीनंतर पंचनामे, ई-केवायसी पूर्ण; तरीही भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप
साक्री | प्रतिनिधी
मार्च महिन्यात साक्री तालुक्यात झालेल्या भीषण गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी साक्री तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई वितरित करण्याची मागणी करण्यात आली.
गेल्या उन्हाळ्यात मार्च महिन्यात साक्री तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे कांदा, मका, पपई, डाळिंब तसेच विविध उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चार-पाच महिने कष्ट करून जोपासलेली पिके काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच गारपीटीने उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे मानसिक खच्चीकरणही झाले.
गारपीटीनंतर महसूल विभाग आणि कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी करून पंचनामे केले. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या. शासनाच्या सूचनेनुसार सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियाही पूर्ण केली. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे आणि शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सोनवणे यांची भेट घेत निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कावठे, भाडणे, पेरेजपूर, आष्टाणे, छडवेल (प.) , काटवान तसेच तालुक्यातील इतर भागांमध्ये गारपीटीमुळे उन्हाळी पिकांचे जवळपास १०० टक्के नुकसान झाले होते. संबंधित यंत्रणांनी पंचनामे करून लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या असतानाही प्रत्यक्ष मदत अद्याप मिळालेली नाही.
यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. नुकसानभरपाईची रक्कम वेळेत मिळाली असती, तर पेरणीसाठी मोठा आधार मिळाला असता. मात्र आर्थिक संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा अन्य मार्गाने पेरणी पूर्ण केली असून आता तरी शासनाने नुकसानभरपाई तातडीने वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात माजी नगरसेवक बाळा शिंदे, पंडितराव शेवाळे, दिलीप सोनवणे, अरुण शेवाळे, संभाजी बोरसे, किशोर शेवाळे, विश्वास सोनवणे, नारायण शेवाळे, संजय सोनवणे, विलास शेवाळे, प्रकाश शेवाळे, राजेंद्र बोरसे, निलेश शेवाळे, दयानंद बोरसे, दीपक सोनवणे, हिम्मत देवरे, प्रशांत शेवाळे, निवृत्ती शेवाळे, भाऊसाहेब देवरे, राजेंद्र देवरे, तुषार पाटील, योगेश बोरसे, सागर पवार, राहुल शेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शासनाने नुकसानभरपाईचे वितरण तातडीने न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी दिला.
