Spread the love

वन विभागाची धडक कारवाई; बेकायदेशीर साग वाहतूक करणारी नॅनो कारसह १,००८ साग अनघड बेलन जप्त

गस्ती पथकाचा थरारक पाठलाग; चालक केळीच्या बागेत वाहन टाकून पसार, सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चोपडा | प्रतिनिधी (राहुल पाटील)

यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत बेकायदेशीर वनउत्पादनाची वाहतूक करणारी नॅनो कार जप्त केली. या कारमधून १,००८ नग सागाचे अनघड बेलन हस्तगत करण्यात आले असून, वाहनासह एकूण सुमारे ९० हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर वाहनचालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) पहाटे २ वाजल्यापासून वरगव्हाण–लोणी (पंचक) रस्त्यावर संपूर्ण गस्ती पथकाने सापळा रचला होता. सकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास MH-43-AJ-3132 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची नॅनो कार संशयास्पदरीत्या येताना दिसली. वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच चालकाने वाहन भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

गस्ती पथकाने तत्काळ पाठलाग सुरू केला. दरम्यान, चालकाने साई मंदिराजवळील केळीच्या बागेत वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. वाहन सुरू होत नसल्याने वनक्षेत्रपाल अडावद यांच्या शासकीय वाहनाच्या मदतीने ते टोचन करून मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे आणण्यात आले.

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये १,००८ नग सागाचे अनघड बेलन आढळून आले. पंचनामा करून वाहन व वनउत्पादनासह एकूण ९०,१०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो मुख्य विक्री केंद्र, चोपडा येथे जमा करण्यात आला आहे.

या प्रकरणी आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उपवनसंरक्षक सौरिष सहायविभागीय वनाधिकारी (दक्षता) राजेंद्र सदगीरसहायक वनसंरक्षक एम. बी. पाटीलसहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटीलवनपाल के. एल. धनगरवनपाल संजय पाटीलवनरक्षक सतीश वाघमारेवनरक्षक आय. बी. चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल एस. आर. तडवी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version