Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरासह दलित वस्ती विकासापासून वंचित; ग्रामस्थांचा संताप

निकृष्ट कामांची चौकशी, मूलभूत सुविधा तातडीने द्या; अन्यथा जनआंदोलनाचा इशारा

सोयगाव | प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिप्री येथील दलित वस्तीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील दुर्लक्ष, सिमेंट रस्ता व गटार नसणे तसेच विविध विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आवश्यक सुविधा नसल्याने परिसरात पाणी साचते व अस्वच्छता निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना पुतळ्याला अभिवादन करण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

दलित वस्तीमध्ये अद्याप सिमेंट रस्ते व गटारांची सुविधा उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात चिखल व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या भागातील विकासकामांकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी ग्रामसेवक व सरपंचांवर केला आहे.

याशिवाय, १४ वा व १५ वा वित्त आयोग निधीतून करण्यात आलेल्या कामांची तसेच जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाच्या कामांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, या मागण्यांसाठी १० मार्च २०२६ रोजी पंचायत समिती, सोयगाव कार्यालयासमोर आमरण उपोषणही करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

माळेगाव पिप्री येथील दलित वस्तीतील विकासकामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व संबंधित प्रशासनाकडे केली आहे. तसेच मागण्या प्रलंबित राहिल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version