डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा विस्कळीत होऊ देऊ नका!
भाजपा जळगाव महानगरचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अत्यावश्यक आरोग्य सेवा सुरू ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवांवर परिणाम होऊ नये, यासाठी भाजपा जळगाव महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. संपामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच अत्यावश्यक आरोग्य सेवा अखंडित सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभारावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात ICU, आपत्कालीन सेवा (Emergency Services) आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा कोणत्याही परिस्थितीत बंद पडू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गंभीर रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाला करण्यात आले.
याशिवाय ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ आणि ‘आयुष्मान भारत’ यांसारख्या शासकीय आरोग्य योजनांचा लाभ पात्र व गरजू रुग्णांना नियमितपणे मिळत राहावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
भाजपाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, “सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची आणि जीविताची जबाबदारी सर्वोच्च असून, कोणत्याही परिस्थितीत रुग्णसेवा खंडित होऊ नये,” अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नगरसेवक निलेश तायडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
