Spread the love

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची पुनर्नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा विश्वास; ‘गो-१० व्हिजन’द्वारे आयोगाला देशातील आदर्श संस्थेचे स्थान मिळवून देण्याचा निर्धार

पारोळा | प्रतिनिधी (सुरेश पाटोळे)

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा मागील कार्यकाळ ६ जुलै २०२६ रोजी पूर्ण झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत शेखर मुंदडा यांची महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे. याबाबतची नियुक्ती ४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर करण्यात आली.

पुनर्नियुक्तीनंतर शेखर मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले. तसेच आगामी कार्यकाळात राज्यातील गोसंवर्धनाच्या कार्याला अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनीही अधिकृत नियुक्ती अधिसूचनेची प्रत देत त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील गोशाळांचे सक्षमीकरण, देशी गोवंशाचे संरक्षण, संगोपन आणि गो-आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.

‘गो-१० व्हिजन’ची घोषणा

शेखर मुंदडा यांनी सांगितले की, पुढील तीन वर्षांत ‘गो-१० व्हिजन’ अंतर्गत महाराष्ट्र गोसेवा आयोगाला देशातील सर्वोत्कृष्ट आणि आदर्श आयोग म्हणून विकसित करण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करण्यात येईल. गोसंवर्धन, गोशाळा सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी हा कार्यकाळ पूर्णपणे समर्पित असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “हा सन्मान केवळ पदाचा नसून महाराष्ट्रातील गोसेवा चळवळीला अधिक उंचीवर नेण्याची एक पवित्र जबाबदारी आहे,” असेही शेखर मुंदडा यांनी नमूद केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version