जिवंत बांधकाम कामगारांना ‘मृत’ दाखवून २३.४० लाखांचा घोटाळा; १० जणांविरुद्ध गुन्हा
बनावट मृत्यू दाखल्यांच्या आधारे शासनाची फसवणूक; बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध
पारोळा | प्रतिनिधी : सुरेश पाटोळे
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या व गौर गावांमध्ये जिवंत बांधकाम कामगारांना कागदोपत्री मृत दाखवून शासनाच्या विविध योजनांतील २३ लाख ४० हजार रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी १० जणांसह बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
बनावट मृत्यू दाखल्यांद्वारे लाखोंची फसवणूक
प्राथमिक तपासात जिवंत नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे बनावट मृत्यू दाखले तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याआधारे खोटे वारसदार दाखवून शासकीय योजनांमधील लाभ उचलण्यात आला.
प्रत्येक प्रकरणात सुमारे २ लाख ३४ हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्यामध्ये –
-
नैसर्गिक मृत्यू लाभ – २ लाख रुपये
-
वारस/विधवा पेन्शन – २४ हजार रुपये
-
अंत्यसंस्कार सहाय्य – १० हजार रुपये
अशा १० प्रकरणांमध्ये एकूण २३ लाख ४० हजार रुपयांची शासनाची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
ग्रामसेवकांच्या अहवालातून बनावटपणा उघड
या प्रकरणाची चौकशी करताना संबंधित ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांच्या अहवालात संबंधित मृत्यू प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्राथमिक चौकशीतही मृत्यू दाखले बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे.
एकाने रक्कम परत केली, इतरांविरुद्ध गुन्हा
फसवणुकीची रक्कम परत करण्यासाठी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्यानुसार लक्ष्मण बाबुराव टाक यांनी लाभाची रक्कम शासनाकडे परत जमा केली. मात्र, इतरांनी रक्कम न भरल्याने ४ ऑगस्ट रोजी १० जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींचा समावेश
या प्रकरणातील आरोपींमध्ये बालाजी रामजी पांचाळ, बालाजी भीमराव कदम, अण्णाराव धोंडीबा भालेराव, माणिक महादू डरांगे, मिराबाई देविदास पांचाळ, मुक्ताबाई नामदेव डाखोरे, दिगंबर व्यंकटी जोगदंड, मुरलीधर नारायण जोगदंड, ज्ञानोबा चुडामणी पारवे आणि सुमनबाई बालाजी पांचाळ यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांचा शोध
या घोटाळ्यात बनावट मृत्यू दाखले आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असून, या रॅकेटमागील सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे.
