Spread the love

आभोडा येथे रावेर पोलिसांची धडक कारवाई; ६०० किलो संशयित गोमांस व ३ जिवंत गोवंश जप्त, एकाला अटक

बेकायदेशीर गोवंश कत्तल व मांस विक्रीप्रकरणी गुन्हा; दुसरा संशयित फरार

रावेर | विशेष प्रतिनिधी (प्रदीप खैरे)

रावेर तालुक्यातील आभोडा येथे बेकायदेशीर गोवंश कत्तल व मांस विक्री केल्याच्या संशयावरून रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत सुमारे ६०० किलो संशयित गोमांस आणि ३ जिवंत गोवंश जप्त केले. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून दुसरा संशयित फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आभोडा गावातील बसस्थानक परिसरात गोवंशाची कत्तल करून मांस विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज महाजन यांच्या पथकाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी एका घरावर छापा टाकला.

छाप्यात उस्मान हसन कुरेशी (वय ४८, रा. आभोडा) हा घरात मांस कापताना आढळून आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्याला ताब्यात घेऊन सुमारे ३०० किलो संशयित गोमांस, कुऱ्हाड आणि सुरे जप्त करण्यात आले.

यानंतर चावडी परिसरात आणखी एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच इरफान रहेमान उर्फ लंगड्या कुरेशी (वय ३२, रा. आभोडा) हा पसार झाला. त्याच्या घरातूनही सुमारे ३०० किलो संशयित गोमांस व काही हत्यारे जप्त करण्यात आली.

कारवाईदरम्यान चावडी व आठवडे बाजार परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचा संशय असलेल्या तीन जिवंत गायीही पोलिसांना आढळून आल्या. त्यांना सुरक्षिततेसाठी गोशाळेत हलविण्यात आले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्या उपस्थितीत जप्त केलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित मांसाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३७६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या कारवाईत उस्मान हसन कुरेशी याला अटक करण्यात आली असून फरार संशयित इरफान कुरेशी याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज महाजन आणि गुन्हे शोध पथकाने केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version