दहिगाव ग्रामपंचायत लिपिक रवींद्र पाटील निलंबित; घराच्या उताऱ्यात फेरफार केल्याप्रकरणी कारवाई
मृत व्यक्तीच्या नावाने उतारा देऊन कर्जप्रकरणाला मदत केल्याचा आरोप; ग्रामपंचायतीच्या सर्वानुमते ठरावानंतर निलंबन
यावल | प्रतिनिधी (हर्षल पाटील)
यावल तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयातील लिपिक रवींद्र शिवाजी पाटील यांना घराच्या उताऱ्यात कथित बेकायदेशीर फेरफार केल्याच्या आरोपावरून ग्रामपंचायतीने निलंबित केले आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर करून ही कारवाई करण्यात आली.
घराच्या उताऱ्यात फेरफार केल्याचा आरोप
तक्रारदार हेमराज प्रभाकर पाटील यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घराच्या उताऱ्यावरून त्यांचे नाव कमी करण्यात आले. त्यानंतर त्यांचे दिवंगत भाऊ दिगंबर प्रभाकर पाटील यांच्या नावाने नवीन उतारा देण्यात आला. या उताऱ्याच्या आधारे महिंद्रा फायनान्स कंपनीकडून सुमारे १.५० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळे घराचे उतारे जारी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनंतर कारवाई
या प्रकरणी हेमराज पाटील यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. गटविकास अधिकाऱ्यांनी हा विषय स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतीने निर्णय घेण्याच्या अधिकारातील असल्याचे स्पष्ट केल्यानंतर ग्रामपंचायतीने यावर कार्यवाही सुरू केली.
सर्वानुमते निलंबनाचा ठराव
दि. ६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्व सदस्यांच्या एकमताने लिपिक रवींद्र पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीस ग्रामविकास अधिकारी बोदडे, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
