Spread the love

एक वाढदिवस… दोन वृक्ष’ उपक्रमाने सत्रासेन आश्रम शाळेचा हरित संकल्प

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने वृक्षारोपण; प्रत्येक वाढदिवशी दोन वृक्ष लावण्याचा शिक्षकांचा निर्धार

चोपडा | प्रतिनिधी (राहुल पाटील)

झाडे लावा, झाडे जगवा; निसर्गाशी नाते जपा” या संदेशाला कृतीची जोड देत धनाजी नाना प्राथमिक तसेच डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, सत्रासेन येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी “एक वाढदिवस… दोन वृक्ष” हा अभिनव संकल्प स्वीकारत प्रत्येक शिक्षकाने वाढदिवसानिमित्त दोन वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील संदेशाने करण्यात आली. यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र रायसिंग भादले यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिलेल्या १०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्या हरित अभियानाला पुढे नेत गांधी रिसर्च फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या वृक्षांमुळे पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमाला नवी ऊर्जा मिळाली.

यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे प्रतिनिधी चंद्रकांत चौधरी प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर रायसिंग भादले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. वाढदिवसानिमित्त योगेश ईश्वरलाल पाटील आणि विकास रामदास पाटील यांनी प्रत्येकी दोन वृक्ष लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.

विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. मान्यवरांनी मार्गदर्शन करताना महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन भालचंद्र शिवाजी पवार यांनी केले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र रायसिंग भादले, सचिव ज्ञानेश्वर रायसिंग भादले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी. पी. पावरा, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वंदना सरदार पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वस्तीगृह विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आजचे एक रोपटे म्हणजे उद्याच्या पिढीसाठी प्राणवायूचा अमूल्य ठेवा” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version