Spread the love

तीन बैलजोड्या चोरणाऱ्या टोळीचा सावदा पोलिसांकडून पर्दाफाश; ७.१० लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघे अटकेत

सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई; सहा बैलांसह बोलेरो पिकअप व मोटारसायकल जप्त, एक आरोपी फरार

सावदा / रावेर | विशेष प्रतिनिधी : प्रदीप खैरे

सावखेडा बुद्रुक परिसरातून अवघ्या काही तासांच्या अंतराने तीन बैलजोड्या चोरीला गेल्याच्या घटनेचा सावदा पोलिसांनी वेगाने तपास करत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चोरीला गेलेले सहा बैल, गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप आणि एक मोटारसायकल असा एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

गोठ्यातून सहा बैलांची चोरी

सावखेडा बुद्रुक येथील अलाउद्दीन नबाबत्त तडवी, गुणशेर बशीर तडवी आणि संजू नबाबत्त तडवी यांच्या गोठ्यातून ७ ऑगस्टच्या मध्यरात्री १.३० ते ८ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेच्या दरम्यान तीन बैलजोड्या म्हणजेच सहा बैल चोरीला गेले. चोरी झालेल्या बैलांची अंदाजे किंमत ९० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर सावदा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील पशुपालकांमध्ये या घटनेमुळे चिंता निर्माण झाली होती.

सीसीटीव्ही आणि गोपनीय माहिती ठरली महत्त्वाची

गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर यांच्याकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याचवेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आवेश खान एजाज खान (वय २०, रा. खाजानगर, सावदा) आणि शेख हयात शेख मासुम (वय २१, रा. मन्यारवाडा, चिनावल) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या माहितीनुसार नासीर शेख चांद कुरेशी (वय ४२, रा. प्रतिभानगर, वरणगाव) आणि शेख तजीक (रा. रसलपूर, ता. रावेर) यांच्या सहभागाची माहिती समोर आली.

चोरीला गेलेले सहा बैल हस्तगत

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीला गेलेल्या तिन्ही बैलजोड्या हस्तगत केल्या. त्यानंतर त्या संबंधित मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या.

तसेच संशयित आरोपी नासीर शेख चांद कुरेशी याच्याकडून ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप आणि २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली. बैलांसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख १० हजार रुपये आहे.

चौघे अटकेत; एक आरोपी फरार

या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती आहे. फरार आरोपी शेख राजीक याचा पोलीस शोध घेत आहेत.

सावदा पोलिसांची धडक कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, सपोनि जयराम खोडपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश बाविस्कर, मेहेरबान तडवी, संजीव चौधरी, अतुल तडवी, संजय तडवी आणि चालक नामदेव कापडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईमुळे पशुधन चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठा आघात केला असून, चोरीला गेलेले बैल परत मिळाल्याने पशुपालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version