न्याय विश्वास फाउंडेशनतर्फे जळगावात मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अँड. अनिकेत निकम यांच्या संकल्पनेतून उपक्रम; जमीन, कौटुंबिक वाद, फौजदारी गुन्हे, सायबर फसवणूक यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
जळगाव | प्रतिनिधी : सोमेश मुळे : सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्कांची आणि कायद्याची योग्य माहिती मिळावी, तसेच आर्थिक किंवा अन्य अडचणींमुळे कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, या उद्देशाने न्याय विश्वास फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अँड. अनिकेत उज्वल निकम यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला जळगावकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘सामान्य माणसाचा विश्वासू न्यायसारथी’
कायद्याचे क्लिष्ट नियम, न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर बाबींबाबत सामान्य नागरिकांच्या मनात असलेली भीती दूर करण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ‘सामान्य माणसाचा विश्वासू न्यायसारथी’ हे ब्रीद घेऊन फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक नागरिकांना त्यांच्या कायदेशीर प्रश्नांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील फौजदारी वकील अँड. अनिकेत निकम यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. अँड. अनिकेत निकम हे ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा खासदार पद्मश्री उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र आहेत.
विविध कायदेशीर विषयांवर मोफत सल्ला
शिबिरात तज्ज्ञ वकिलांच्या पॅनेलने नागरिकांना विविध महत्त्वाच्या कायदेशीर विषयांवर विनामूल्य मार्गदर्शन केले. यामध्ये जमीन व मालमत्ता वाद, खरेदी-विक्री व वारसा हक्क, कौटुंबिक वाद, पोटगी व विवाहविषयक कायदे, फौजदारी गुन्हे व जामीन प्रक्रिया, सायबर क्राईम व आर्थिक फसवणूक, बँक व्यवहारांतील गैरप्रकार तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क आणि शासकीय कायदे यांचा समावेश होता.
शंकांचे निरसन; गरजू नागरिकांना मिळाली कायदेशीर दिशा
यापूर्वीच्या शिबिराला मिळालेल्या प्रतिसादानंतर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली. अनेक नागरिकांनी तज्ज्ञ वकिलांशी थेट संवाद साधत आपल्या वैयक्तिक व कायदेशीर समस्यांबाबत मार्गदर्शन घेतले. योग्य कायदेशीर माहितीअभावी अडचणीत असलेल्या नागरिकांना या शिबिरामुळे पुढील कार्यवाहीची दिशा मिळाली.
‘कायद्याचे ज्ञान हा नागरिकांचा अधिकार’
यावेळी आयोजकांनी सामाजिक बांधिलकीची भूमिका स्पष्ट केली. पैशांअभावी किंवा योग्य कायदेशीर मार्गदर्शन न मिळाल्यामुळे गरीब व गरजू नागरिक न्यायापासून वंचित राहू नयेत, यासाठी न्याय विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून असे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमाबद्दल जळगावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अँड. अनिकेत निकम तसेच न्याय विश्वास फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले.
