दहा महिन्यांपासून ग्रामपंचायतीचे दप्तर अपूर्ण; कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्याचीही जोरदार मागणी
पहूर : पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. ७ मे २०२६) आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा विविध प्रश्नांवरून चांगलीच गाजली. ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात सुरुवातीला शांत वातावरणात संवाद सुरू असताना ग्रामपंचायतीच्या दप्तर प्रकरणावरून अचानक वातावरण तापले. तब्बल दहा महिने उलटूनही माजी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर हस्तांतरित न झाल्याचा मुद्दा सभागृहात ऐरणीवर आला आणि यामुळे मोठा वाद निर्माण झाला.
“दप्तराची जबाबदारी नेमकी कोणाची?”
ग्रामसभेत माजी प्रशासक रामचंद्र वानखेडे यांनी प्रशासनाला थेट जाब विचारत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
“जनतेला वेठीस धरून नेमकं कोणाचं रक्षण केलं जात आहे? दहा महिने दप्तर न देणे ही साधी चूक नसून गंभीर प्रशासनिक दुर्लक्ष आहे,” असे म्हणत त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली.
विद्यमान ग्रामविकास अधिकारी शिवदास गव्हाळे यांनी परिस्थिती स्पष्ट करत सांगितले की, माजी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केवळ चालू वर्षाचा चार्ज दिला असून मागील कार्यकाळातील संपूर्ण दप्तर अद्याप त्यांच्या ताब्यात नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
दरम्यान, माजी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी सर्व आरोप फेटाळले. “शासकीय दप्तर मी घरी कशाला नेईन? ते ग्रामपंचायत कार्यालयातच आहे. तिथेच शोधावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पूर्णवेळ अधिकाऱ्याअभावी ग्रामस्थ संतप्त
पहूर कसबे सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. विद्यमान अधिकारी शिवदास गव्हाळे यांच्याकडे रांजणी गावाचाही अतिरिक्त कार्यभार असल्याने स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात आली. गावासाठी कायमस्वरूपी व पूर्णवेळ अधिकारी नेमावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.
मूलभूत सुविधांवरूनही प्रशासन धारेवर
ग्रामसभेत दप्तर प्रकरणासोबतच अनेक स्थानिक प्रश्नांवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. गावात वैकुंठ रथ व शववाहिकेची अत्यावश्यक गरज असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. स्मशानभूमी आणि रस्त्यांची दुरवस्था, मूलभूत सुविधांकडे होत असलेले दुर्लक्ष यावरही प्रशासनाला धारेवर धरले गेले.
यावेळी मधुकर पवार आणि अशोक जाधव यांनी रखडलेल्या वाघूर धरण पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उपस्थित करत ही योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली. विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि ग्रामस्थांच्या संतप्त भावना यामुळे पहूर कसबे येथील ग्रामसभा चांगलीच गाजली.
