शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार प्रशासन; “योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही” – बाधित शेतकरी
पहूर (गणेश वानखेडे) : जळगाव-जालना रेल्वे मार्ग प्रकल्प कामाला वेग आला असून, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी १३ मे २०२६ रोजी पहूर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती एरंडोल विभागाचे उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ही माहिती स्थानिक स्तरावर रामेश्वर भाऊ पाटील, योगेश भांडगे, राजू जाधव, अॅड. संजय पाटील आणि प्रदीप लोढा यांच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली.
रेल्वे मार्गासाठी जमिनींचे संपादन
प्रसिद्धीपत्रकानुसार, जळगाव ते जालना या नव्या रेल्वे मार्गासाठी पहूर परिसरातील खासगी जमिनी संपादित करण्यात येत आहेत. यासाठी रेल्वे अधिनियम कलम 20 (A) अंतर्गत २६ मे २०२५ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.
त्यानंतर संपादित जमिनींची संयुक्त मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागामार्फत ६ एप्रिल २०२६ रोजी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष मोजणीदरम्यान काही भूधारकांनी विरोध दर्शवल्याने ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. याबाबतचा पंचनामा संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
दरम्यान, रेल्वे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “योग्य आणि पुरेसा मोबदला मिळाल्याशिवाय रेल्वे मार्ग होऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका अनेक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
“शेताचा तुकडा हा केवळ जमीन नसून आमच्या काळजाचा तुकडा आहे. शासनाने आमच्या भावनांशी खेळ करू नये,” अशी भावना राजू जाधव, तुषार बनकर, रामेश्वर पाटील, लक्ष्मण गोरे, बाबुराव घोंगडे, चेतन रोकडे, योगेश भांडगे, सुरेश घोंगडे आणि शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली.
बैठकीकडे परिसराचे लक्ष
प्रशासनाने संबंधित शेतकरी आणि जमीनधारकांनी बैठकीस उपस्थित राहून आपली मते, सूचना आणि अडचणी मांडाव्यात, असे आवाहन केले आहे. या बैठकीत प्रशासन आणि शेतकरी यांच्यात सकारात्मक संवाद होऊन तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. तरी १३ मे २०२६ रोजी आयोजित विशेष बैठकीस सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
