छोटूभाई पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून काम पूर्णत्वाचे आश्वासन
पारोळा (संदीप पाटील) : चोरवड परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे छोटूभाई पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चोरवड, भोंडण, शिरसमणी, टिटवी आदी गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
पारोळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला होता. ही परिस्थिती लक्षात घेता छोटूभाई पाटील यांनी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या सातत्याने भेटी घेत परिसरातील अडचणी शासन दरबारी मांडल्या.
मंत्रीस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील तसेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत छोटूभाई पाटील आणि अमोल पाटील यांच्या प्रयत्नातून पाटचारी संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पुढील एक ते दीड वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये समाधान
या निर्णयामुळे चोरवड, भोंडण, टिटवी, महिंदळे आणि शिरसमणी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यास परिसरातील कृषी उत्पादनालाही मोठा फायदा होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती
बैठकीला व्ही. डी. पाटील, भोसले, विनोद पाटील, कुलदीप पाटील, सुशांत व्यास, डॉ. हर्षल माने, विजय सुदाम पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
