पालकमंत्री गुलाबराव पाटील: जळके येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण
दूध डेरी इमारतीचे भूमिपूजन आणि रामदेववाडी–कुऱ्हाडदे रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ
जळगाव / पाळधी : गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळके येथे नव्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण तसेच दूध डेरीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ग्रामपंचायत व दूध डेरीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या रामदेववाडी ते कुऱ्हाडदे या सुमारे ३ कोटी ८६ लाख रुपयांच्या चार किलोमीटर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. खडीकरण पूर्ण झालेल्या या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी रस्ता ठरणार लाभदायक
या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. रस्त्यावर मोऱ्या, संरक्षण भिंती, खडीकरण, डांबरीकरण आणि मजबुतीकरणाची विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीसह शेतीमालाच्या ने-आणीतही सुलभता निर्माण होणार आहे.
“ग्रामपंचायत कार्यालय हे गाव विकासाचे केंद्र”
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यालय हे गावाच्या विकासाचे केंद्र असून लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारा व्यवसाय असून नव्या दूध डेरीमुळे महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंद्याकडेही वळावे, असे आवाहन करत गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच विटनेर ते वसंतवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रस्तावित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. रामदेववाडी ते कुऱ्हाडदे रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मान्यवरांची मोठी उपस्थिती
या कार्यक्रमाला पवन सोनवणे, रमेशआप्पा पाटील, पी. के. पाटील, रवी कापडणे, शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, राजू भैय्या पाटील, नवल पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या इंदुबाई वाघ आणि उज्वला मोरे यांचा सत्कारही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेशआप्पा पाटील यांनी केले. प्रास्ताविक पी. के. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सरपंच राजू भैय्या पाटील यांनी मानले.
