पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने अंजनी धरणातून उद्या पाणी सोडणार; ११ गावांची तहान भागणार
धरणगाव / जळगाव : मे महिन्याच्या तीव्र उन्हामुळे पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील नागरिकांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विशेष पुढाकारातून शुक्रवार, दि. १५ मे २०२६ रोजी अंजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे. या निर्णयामुळे धरणगाव तालुक्यातील तब्बल ११ गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोत कोरडे पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. विशेषतः महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत होती. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरू करत तातडीने निर्णय घेतला.
प्रशासनाची तातडीची कार्यवाही
निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या आदेशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार सकाळपासून अंजनी नदीपात्रात सुमारे १५० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. हे पाणी पिंप्रीमार्गे सोनवदपर्यंत पोहोचणार असून धरणगाव तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता का होईना, पण सुटणार आहे.
या ११ गावांना मिळणार मोठा दिलासा
या आवर्तनाचा लाभ कल्याण (खु.), वाघळूद, चावलखेडा, पिंपळेसीम, भोद बु., हणमंतखेडे खु., पिंप्री खु., कल्याणेहोळ, भोद खु., हिंगोणे खु. आणि सतखेडा या गावांना होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.
पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. काही ठिकाणी तर पाण्यासाठी वाद-विवाद आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता अजनी धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांना प्रशासनाची सक्त ताकीद
धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पिण्यासाठी आरक्षित असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना कृषीपंप बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. “कोणीही शेतीसाठी पाण्याचा उपसा करू नये. हे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे,” असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत. यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाची विशेष पथके नदीपात्र परिसरावर लक्ष ठेवून असणार आहेत.
“पाण्याचा प्रत्येक थेंब जपा”
या निर्णयानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना भावनिक आवाहन करत सांगितले की, “ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नागरिकांसह मुक्या जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळावे यासाठी हे आवर्तन सोडले जात आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करावा.” दरम्यान, प्रशासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे धरणगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
