मुख्यमंत्री फडणवीसांना राजाराम खरात यांचा सवाल; RTE विद्यार्थ्यांसाठी मदतीची मागणी
मुंबई : कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्याच्या घोषणेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर. के.)चे पक्षाध्यक्ष राजाराम खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत शिक्षण आणि गरीब विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी “कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,” असे वक्तव्य केल्यानंतर खरात यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून सरकारच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
खरात यांनी म्हटले आहे की, “ज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, अशा कामांसाठी सरकार ४० ते ५० हजार कोटी रुपये खर्च करत आहे. मात्र दुसरीकडे अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. गरीब पालकांना RTE अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८ ते ९ हजार रुपयांचे पुस्तके, वह्या आणि शालेय साहित्य घेणे परवडत नाही.” त्यांनी सरकारला थेट सवाल करत म्हटले की, “कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, मग शिक्षणासाठी पैसे नाहीत असे कसे? कुंभमेळ्यासाठी ८० ते ९० हजार कोटी रुपये खर्च करा, पण त्यातील किमान दोन टक्के निधी तरी गरीब विद्यार्थ्यांसाठी द्या.”
शिक्षणाला प्राधान्य देण्याची मागणी
राजाराम खरात यांनी राज्यातील बंद पडलेल्या मराठी शाळांचा मुद्दाही उपस्थित केला. “सरकार बंद झालेल्या मराठी शाळा पुन्हा सुरू करेल, याची अपेक्षा नाही. पण निदान गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार तरी करावा,” अशी मागणी त्यांनी केली.
त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. “पंतप्रधान पद मिळाल्यावर काय कराल, हे भविष्यात दिसेल. तरीही पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा,” असा टोलाही त्यांनी लगावला. या निवेदनामुळे राज्यातील शिक्षण, धार्मिक खर्च आणि सरकारी प्राधान्यक्रम यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
