रुग्णसेवेवर परिणाम; महावितरणला तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
पारोळा (संदीप पाटील) : पारोळा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा पुढे आला असून डॉक्टर्स असोसिएशन पारोळा यांनी महावितरण विभागाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एम.एस.ई.बी. पारोळा कार्यालयाला देण्यात आलेल्या निवेदनात डॉक्टर संघटनेने म्हटले आहे की, शहरात सतत वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अति जोखमीच्या आणि गंभीर रुग्णांवर उपचार करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः अतिदक्षता विभागातील (ICU) अनेक अत्यावश्यक उपकरणे तसेच दंतवैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी साधने इन्व्हर्टरवर कार्यरत राहत नसल्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. संघटनेने नमूद केले की, “इन्व्हर्टरची काही प्रमाणात सुविधा असली तरी सर्व वैद्यकीय उपकरणे त्यावर चालत नाहीत. त्यामुळे अचानक वीज गेल्यास रुग्णसेवा विस्कळीत होते. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.”
पूर्वसूचना देण्याची मागणी
डॉक्टर्स असोसिएशनने महावितरण प्रशासनाला आणखी एक महत्त्वाची मागणी करत सांगितले की, जर अत्यावश्यक कारणास्तव वीजपुरवठा खंडित करावाच लागणार असेल, तर त्याबाबत पूर्वसूचना देण्यात यावी. त्यामुळे रुग्णालयांना वेळेचे नियोजन करून पर्यायी व्यवस्था करता येईल.
शहरातील वाढत्या समस्येमुळे संताप
सध्या पारोळा शहरात वाढत्या उकाड्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थीही त्रस्त झाले आहेत. अशातच आता डॉक्टर संघटनेने अधिकृत निवेदन देत प्रश्न उपस्थित केल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी वाढताना दिसत आहे. या निवेदनावर डॉ. विशाल शेंडे, डॉ. प्रशांत शिनकर आणि डॉ. सचिन रोडपती यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
