आयुक्तांसमोर अतिक्रमणांचा ‘पाढा’; १८ मेपासून आंदोलनाचा इशारा
धुळे (सुनील निकम) : धुळे शहरात महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून आता वाद निर्माण झाला असून, “विशिष्ट भाग आणि विशिष्ट समुदायांवरच कारवाई होत आहे,” असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत शहरातील सर्वच अतिक्रमणे निष्पक्षपणे हटविण्याची मागणी केली.
बापू बागुल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा प्रशासनाला निवेदन देत शहरातील विविध भागांतील अतिक्रमणांची सविस्तर माहिती आयुक्तांसमोर मांडली. यावेळी शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याचा आरोप करत संबंधित ठिकाणांची यादीही प्रशासनाला देण्यात आली.
“भेदभाव नको, सर्वांवर समान कारवाई करा”
सामाजिक कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनावर अतिक्रमण मोहिमेत भेदभाव होत असल्याचा आरोप केला. “विशिष्ट भागातच मोहीम राबवून इतर भागांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अतिक्रमण हटाव कारवाई सर्वांसाठी समान असली पाहिजे,” अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
शहरातील सार्वजनिक रस्ते, बाजारपेठा आणि पदपथांवरील सर्वच अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
१८ मेपासून आंदोलनाचा इशारा
बापू बागुल यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “मनपा प्रशासनाने आम्ही दिलेल्या यादीतील अतिक्रमणांवर कारवाई केली नाही, तर १८ मेपासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन करण्यात येईल.” शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून आता राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या भेटीदरम्यान बापू बागुल, शंकर खरात, संजय अहिरे, बापू बाविस्कर, सागर धिवरे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
