नगरसेवक आक्रमक; अधिकाऱ्यांना धारेवर धरत तातडीने उपाययोजनांची मागणी
धुळे (सुनील निकम) : धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील रस्ते, वीजपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांवरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. स्थायी समिती सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
शहरातील खराब रस्ते, ठप्प स्वच्छता व्यवस्था आणि वारंवार उद्भवणाऱ्या विजेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित केला. विशेषतः कचरा व्यवस्थापन आणि रस्त्यांच्या समस्यांवरून नगरसेविका वंदना भामरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली.
विजेच्या प्रश्नावरही संताप
तर वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि अपुऱ्या स्ट्रीट लाईट्सच्या समस्यांवरून नगरसेवक धीरज कलंत्री आणि अमोल मासुळे यांनी सभागृहात आवाज उठवत प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ सभागृहातील वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. विविध प्रभागांतील नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही काही सदस्यांनी दिला.
अधिकाऱ्यांकडून आश्वासन
नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. शहरातील प्रलंबित कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बैठकीला करूना डहाळे, मनोज वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
