मुंबई महानगर उपाध्यक्ष तसेच ठाणे, पालघर व रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदाची धुरा
मुंबई : सामाजिक कार्य, ग्राहक संरक्षण आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने सक्रिय भूमिका बजावणारे श्री. रमेश साहेबराव गुडेकर यांची लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था यांच्या वतीने महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची मुंबई महानगर उपाध्यक्ष तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. दिनकर आमकर साहेब यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष (मागासवर्गीय विभाग) मा. श्री. बाबाजी हरी नन्नवरे साहेब, मुंबई महानगर अध्यक्ष मा. श्री. पांडुरंग सकटे साहेब, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. रमेश गुडेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्राहक हक्क संरक्षणासाठी सातत्याने कार्य केले आहे. समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी प्रभावीपणे आवाज उठवत जनहिताच्या कामांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांच्या नियुक्तीमुळे संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळून संघटनात्मक विस्तारास गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक संघटना, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून श्री. रमेश साहेबराव गुडेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
