विद्यापीठाच्या “प्रख्यात विद्वान” पदासह आयसीएआयच्या प्रादेशिक समितीवरही निवड
जळगाव : जळगाव शहरातील युवा चार्टर्ड अकाउंटंट तथा जळगाव आयसीएआय शाखेचे माजी अध्यक्ष सीए हितेश आगीवाल यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती झाल्याने जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे त्यांची “प्रख्यात विद्वान (वाणिज्य)” म्हणून वैधानिक नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३४(४)(ई) अंतर्गत ही नियुक्ती अधिकृत अधिसूचनेद्वारे करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राहणार आहे.
या नियुक्तीद्वारे सीए हितेश आगीवाल हे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभवाचा संगम साधत अभ्यासक्रम रचना, कौशल्य विकास, इंटर्नशिप तसेच उद्योगाभिमुख शिक्षण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांमध्ये योगदान देणार आहेत.
आयसीएआयच्या प्रादेशिक समितीवरही नियुक्ती
याचबरोबर, भारतीय सनदी लेखाकार संस्थान (ICAI) च्या पश्चिम भारत क्षेत्रीय मंडळामार्फत त्यांची धर्मादाय विश्वस्त संस्था, व्यक्ती संघ (AOP), इतर कृत्रिम व्यक्ती तसेच सहकारी संस्था प्रादेशिक समितीवर वर्ष २०२६-२७ साठी नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती ट्रस्ट, सहकारी संस्था आणि विविध संस्थात्मक रचनांशी संबंधित धोरणात्मक व व्यावहारिक विषयांवर काम करते. या माध्यमातून सीए आगीवाल यांना संस्थात्मक व्यवस्थापन आणि आर्थिक धोरण क्षेत्रात कार्य करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळणार आहे.
शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न
सीए हितेश आगीवाल हे कर सल्ला, लेखापरीक्षण आणि व्यवसाय सल्लागार क्षेत्रात कार्यरत असून, विविध शासकीय आणि व्यावसायिक समित्यांवर त्यांनी यापूर्वीही उल्लेखनीय योगदान दिले आहे.
या दुहेरी नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना सीए आगीवाल म्हणाले की, “ही केवळ सन्मानाची बाब नसून मोठी जबाबदारी आहे. शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष व्यवहार यांमधील दरी कमी करत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि भविष्याभिमुख बनविण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहील.” तसेच, क्षेत्राशी संबंधित कोणत्याही सूचना, मते किंवा अडचणी असल्यास त्या hiteshagiwal30@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून अभिनंदन
सीए हितेश आगीवाल यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या नियुक्तींमुळे जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
