शॉर्टसर्किटमुळे लागली आग; वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला
जळगाव (सुमेश मुळे) : जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आज दुपारच्या सुमारास विजेच्या डीपीला आग लागल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या ऑफिस क्रमांक ०१ च्या बाजूलाच असलेल्या डीपीमध्ये तापमान वाढल्याने शॉर्टसर्किट झाले आणि काही क्षणांतच परिसरात आग पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, डीपीजवळ मोठ्या प्रमाणावर कोरडे गवत साचलेले असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पंपाच्या सहाय्याने आग विझविण्याचे काम हाती घेतले. जवानांच्या तत्परतेमुळे आग वेळीच नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून परिसरातील कोरडे गवत व काही साहित्य जळाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग विझवल्यानंतर परिसर सुरक्षित करण्यात आला.
दरम्यान, वाढते तापमान, विजेच्या डीपीजवळील कोरडे गवत आणि दुर्लक्षित विद्युत यंत्रणा यामुळे अशा घटनांची शक्यता वाढत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विभागाने अशा धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
— पत्रकार : सुमेश मुळे
